हैद्राबाद : वृत्तसंस्था
देशातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना एक थरारक घटना हैदराबादमधून समोर आली आहे. येथील प्रख्यात वेलजन उद्योग समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही. सी. जनार्दन राव यांची नातवाने ७३ वार करून हत्या केली. मालमत्तेच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. के. कीर्ती तेजा या नातवाला अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, व्ही. सी. जनार्दन राव (वय ८६) यांच्यावर नातू कीर्ती तेजा (२८) याने गुरुवारी (दि. ६) चाकूने ७३ वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी या भांडणामध्ये पडलेल्या स्वतःच्या आईवरही त्याने वार केले. त्यात त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी कीर्ती तेजा हा उच्च शिक्षित आहे. त्याने अमेरिकेत मास्टर्स डिग्री मिळवली आहे. अलीकडेच तो हैदराबादला परत आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून, तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वेलजन उदयोग समूहाची स्थापना १९६५ मध्ये करण्यात आली आहे. जहाज बांधणी, ऊर्जा, मोबाईल आणि औद्योगिक क्षेत्रात हा समूह कार्यरत असल्याचे या समूहाच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आले आहे.