मुंबई : बाजाराचा शेवटचा वर्किंग डे शुक्रवारी शेअर मार्केट निर्देशांकात मोठी घट दिसून आली आहे. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्सची1350 अंकांनी घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स इंडेक्स 720 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला. शुक्रवारी सकाळी 10.41 च्या सुमारास बीएसई सेन्सेक्स 1,322.44 पॉइंट्स म्हणजेच 2.25% ने घसरला. तर निफ्टीच्या निर्देशांकात सुद्धा घट पाहायला मिळाली. निफ्टी 405.85 पॉइंट आणि 2.31% ने घसरून 17,130 वर आले.
तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचे नवीन व्हेरिएंट आल्याने अर्थव्यवस्थेत ही घसरण पाहायला मिळाली असावी. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही ठिकाणी फक्त फार्मास्युटिकल कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले. तर ऑटो मोबाइल, पोलाद, वित्त आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे शेअर घसरत राहिले.
दक्षिण आफ्रीकेत कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट सापडला आहे. हा व्हेरिएंट समोर आल्यानंतर भारतात सुद्धा केंद्राकडून अलर्ट जारी करताना राज्यांना चाचण्या वाढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच, परदेशातून भारतात येणाऱ्यांच्या आरोग्यावर सरकार करडी नजर ठेवणार आहे.
शेअर बाजार सुरू होण्यापूर्वी खुल्या सत्रातच सेन्सेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. बाजार उघडला तेव्हा तो सुमारे 720 अंकांनी घसरला आणि 58,075.93 अंकांवर उघडला. तर गुरुवारी सेन्सेक्स 58795.09 अंकांवर हिरव्या निशानासह बंद झाला. आशिया खंडातील सर्वच मार्केट पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचाच परिणाम भारतीय शेअर मार्केटवर दिसून आला आहे. SGX निफ्टी, निक्केई, स्ट्रेट टाइम्स, हँगसेंग, तैवान वेटेड, कोस्पी, शांघाय कंपोझिट अशा सर्वच बाजारांमध्ये 1-2% ची घसरण झाली आहे. फार्मा व्यतिरिक्त इतर सर्वच क्षेत्रांच्या आकडेवारीत घट पाहायला मिळाली आहे. सर्वात मोठी घसरण रियल्टी, मीडिया आणि बँकिंगच्या स्टॉक्समध्ये दिसून आली.