ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपचे आमदार परिणय फुकेंवर भावजयीचे गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात अत्याचार व हुंडाबळीमध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते चर्चेत असतांना आता राज्यातील भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर त्यांच्या भावजय प्रिया फुके यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेद्वारे अत्यंत गंभीर आरोप केलेत. फुके यांच्याकडून मला धमकावले जात आहे. मला मारण्यासाठी माणसे पाठवली जात आहेत. मी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली, पण त्यांनीही बघतो-पाहतो यापलिकडे काहीही केले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आमदार परियण फुके यांचे दिवंगत बंधू संकेत फुके यांच्या पत्नी प्रिया फुके यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी उपरोक्त आरोप केले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या.

प्रिया फुके म्हणाल्या की, मी घरात माझ्या पतीचा पैशांचा कारभार, त्यांच्या मालमत्तेविषयी प्रश्न विचारले. तेव्हा तू कोण आहेत?, तुला हे विचारण्याचा काय हक्क आहे? असे विचारत मला रात्री 10 वाजता घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर मला जीवे मारुन टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. तू काही बोललीस तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकू, असे मला धमकावण्यात आले. मला दोन लहान मुले आहेत. मी गेल्या दीड वर्षांपासून आईच्या घरी राहत आहे, असे पत्रकार परिषद घेत प्रिया फुकेंनी म्हटले आहे.

प्रिया फुके म्हणाल्या की, मी मुख्यमंत्र्यांसह अनेक मोठ्या नेत्यांच्या दारात गेले मला मदत करा अशी विनंती केली. पण माझे भाऊ सोबत उभे राहिले नाहीत. पण मी खूप भाग्यशाली आहे कारण रोहिणी खडसे, सुषमा अंधारे या दोन बहिणी माझ्यासोबत उभ्या आहेत. गेली दीड वर्षे मी लढत असताना माझ्यासोबत कुणी का उभे राहत नाही हे मला समजत नाहीये. संकेत फुके यांच्याशी 2012 मध्ये माझे लग्न झाले. 2022 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. लग्नानंतर मी घरातील सर्वात लाडकी सून होते. आम्ही सर्व जण सोबत राहत होतो.

प्रिया फुके म्हणाल्या की, माझ्यासोबत खोटे बोलून संकेतचे लग्न लावून देण्यात आले होते. लग्नापूर्वी संकेतला किडनीचा त्रास होता. त्यांचे ऑपरेशन करण्यात आले होते, ही सर्व माहिती माझ्यापासून लपवण्यात आली. मला हे समजले तेव्हा सांगण्यात आले की तू जर हे बाहेर बोललीस तर तुला किंवा तुझ्या कुटुंबीयांना आम्हा त्रास देऊ.

प्रिया फुके म्हणाल्या की, नीच लेव्हलवर जात मला धमक्या देण्यात आल्या. ज्यामध्ये मला म्हटले की तुमच्या घरी माणसं पाठवून रेप करायला लावू, अशा अनेक चुकीच्या गोष्टी झाल्या पण मी काही बोलले नाही. 2022 मध्ये संकेतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तेव्हा आम्हाला ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. बाहेर याबद्दल काही बोलले तर तुझे कुटुंब संपवू अशी धमकी देण्यात आली. तेव्हापासून मला मारण्यासाठी गुंड प्रवृत्तीचे लोकं पाठवले जात आहे. पण पोलिसांकडून काही कारवाई केली जात नाही.

प्रिया फुके म्हणाल्या की, आई जिवंत असताना अजोबा आजीने मुलांना आमच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी केस केली आहे. माझ्याकडून त्यांना काहीच त्रास दिला नाही तरीही त्यांनी आम्हाला त्रास देणे सुरू ठेवले आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी 3 वेळा भेटले त्यांना कागदपत्रे दिली पण त्यांनी यामध्ये काहीच कारवाई केली नाही. महिला आयोगाला मी 2024 मध्ये तक्रार दिली होती पण त्यांनी मला काहीच मदत केली नाही. आम्हाला मोठी लोकं ओळखतात तुझी केस आम्ही पुढे येऊ देणार नाही. कोर्टात केस जाऊनही तुला काहीच फायदा होणार नाही असेही मला त्यांनी म्हटले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!