मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर नेत्यांची इनकमिंग आऊटगोईंग सुरूच आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फक्त शहादा मतदारसंघातच बंडखोरी का थांबवली? असा सवाल करत डील झाल्याची शंका उपस्थित करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्यासह 91 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय.
९१ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे तळोदा येथे आजी माजी आमदार असलेल्या पिता-पुत्रांमधील अनेक वर्षाची कटूता दूर झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे काँग्रेसची मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे.
शहादा- तळोदा मतदारसंघासाठी महाआघाडीतर्फे काँग्रेसकडून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन आलेले. राजेंद्रकुमार गावित यांना उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारीला विरोध करत महाआघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत घेत काँग्रेसचे तिकिटासाठी तीन कोटी घेतल्याचा आरोप केला होता. या मतदारसंघात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी तर्फे बंडखोरी झाली होती. मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बाळासाहेब थोरात हे हेलिकॉप्टरने नंदुरबार येथे आले आणि बंडखोरांना अर्ज माघार घेण्यास सांगितले. बंडखोरांनी अर्ज माघार घेतला. त्यामुळे महाआघाडी मधील बिघाडी सुरळीत झाल्याची चर्चा सुरू झाली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. तसेच मतदार संघातील 91 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.
उदयसिंग पाडवी म्हणाले की, जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. मात्र बाळासाहेब थोरात हे हेलिकॉप्टरने येऊन फक्त शहादा व नंदुरबार येथील बंडखोरी थांबवली. त्यांना इतर जागा दिसल्या नाही का? त्यामुळे याच्यात काहीतरी डील झाली असेल म्हणून बाळासाहेब थोरात आले. आम्ही पक्षाच्या राजीनामा दिला असून आता कुठल्या पक्षात जाणार नाही. आजपासून भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासाठी प्रचार करणार असल्याचे सांगितले. विविध ठिकाणी सभा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. लोकसभेदरम्यान त्यांनी विविध सभा घेत गावित परिवारावर टीका केली होती. मात्र विधानसभेत गावित परिवारावर कुठलीही टीका करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.