मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश घेणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत असतांना आता मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटील आणि अजित पवारांच्या बंद दाराआडच्या चर्चेवरून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. भविष्यात जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.
जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांच्या बंद दाराआड बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशील समजला नाही. पण जयंत पाटील यांच्या गत काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या पक्षांतराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यातच आता संजय शिरसाट यांनी जयंत पाटील पक्ष सोडतील असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मी अनेक वेळा सांगितले जयंत पाटील तिथे अस्वस्थ आहेत, त्यांना करमत नाही, असे संजय शिरसाट म्हणाले. यापूर्वीच ते अजित दादा यांच्याबरोबर येणार होते. पण, काय झाले माहीत नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड राजकीय चर्चा देखील होऊ शकते. मला त्याबाबत कल्पना नाही. मात्र, भविष्यात जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
संजय शिरसाट यांनी यावेळी बोलताना संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. ज्यांनी गद्दारी केली ते असे बोलतात का? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी करून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीवर बसणारे निष्ठेच्या गोष्टी शिकवतात. यामुळेच यांनी सगळा पक्ष संपवला. संजय राऊत जे बोलतात त्याच्या नेमके उलट घडते हा आतापर्यंतचा इतिहास आहे. म्हणून यापुढे उबाठा आणि राष्ट्रवादीत स्फोट होईल, असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला.
नागपूरमध्ये जी दंगल झाली आहे त्यामागे कोण आहे? ज्यांना मुख्यमंत्री हे गृहमंत्री म्हणून अपयशी आहेत असे दाखवायचे आहे का? याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करायला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. याबाबत संजय शिरसाट यांना विचारले असता, फडणवीसांना खाली दाखवण्यासाठी दंगल केली असेल, तर यात हात कोणाचा आहे हे देखील सांगायला हवे होते, असा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला. महाविकास आघाडीने जाणूनबुजून घडवून आणलेली ही दंगल आहे, असा आरोप करत आमचे सरकार यातील एकही आरोपी सोडणार नाही, असे संजय शिरसाट म्हणाले.