मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली होती आता सध्या राज्य सरकारद्वारे राबवली जाणारी लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत आहे. या योजनेंतर्गत दिली जाणारी रक्कम 2100 रुपये केली जाणार असल्याचे आश्वासन सरकारमधील नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच आता शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी या योजनेविषयी केलेले वक्तव्याच्या चर्चा रंगली आहे.
लाडकी बहीण योजना बंद केली तर इतर 10 योजना सुरू करता येतील, अशाप्रकारचे वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे. एका टीव्ही चॅनेलशी बोलताना रामदास कदम म्हणाले की, ‘बजेट डोळ्यासमोर ठेवून योजना चालू कराव्या लागतात. अंथरुन पाहूनच पाय पसरावे लागतात. आज आपण लाडकी बहीण योजनेचे बजेट पाहिले, तर ते 30 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते आणि एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना चालू करता येतील.’
त्यांच्या या वक्तव्यामुळे आता सरकारकडून लाडकी बहीण योजना भविष्यात बंद केली जाणार का? याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहिन्याला राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, योजनेंतर्गत दरमहिन्याला दिली जाणारी रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या वेळी घोषणा करू त्यानंतर 2100 रुपये दिले जातील, असेही स्पष्ट केले.