पुणे: वृत्तसंस्था
राज्यात मराठीचा अनादर करणार्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिला. येत्या पंधरवड्यात माझ्या विभागाअंतर्गत राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक बोलावून त्यांना या संदर्भात सूचना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाषेच्या संवर्धनासाठी मराठी माणसावर होणार्या अन्यायासंदर्भात राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष करत असलेले काम कौतुकास्पद आहे. शासन म्हणून आम्ही त्यांच्या भूमिकेसोबत राहू, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.
विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने रविवारी पुण्यात आल्यानंतर सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ’आपलीच भाषा बोलली पाहिजे असा अन्य राज्यातील लोकांचा दबाव मुंबई, ठाणे, मुंब्रा, पुणे येथे काही लोक आणत आहेत. गेल्या तीन महिन्यात हे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. याबद्दलचा कायदा आहे.
परंतु असा दबाव आणून मराठी भाषा बोलल्याबद्दल जर मारहाण होत असेल, तर हा कायदा कडक झाला पाहिजे’, असेही सामंत यांनी सांगितले. या विषयासंदर्भात पोलीस अधीक्षकांच्या बैठकीनंतर आवश्यकता भासल्यास शासन अध्यादेश काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती, या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात बोलताना सामंत म्हणाले, ’आता हे शहा यांना आणि ज्यांनी सांगितले त्यांना विचारले पाहिजे. राऊत यांना पत्रकार परिषद घेण्याचे व्यसन लागले आहे.’ आता मी त्यांच्या वेळेच्या आधी पत्रकार परिषद घ्यावी म्हणतो आहे, अशी मिश्कील टिप्पणीही सामंत यांनी या वेळी केली.