मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे तब्बल 35 आमदार भाजपत जाणार असल्याचा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले. भाजपला ते आता नकोसे झालेत. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा लोट्स कार्यक्रम सुरू झाला आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. भाजपच्या कथित फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेले शिंदे सध्या नाराज असताना ठाकरे गटाने हा दावा केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या जे ‘नाराजी’ महानाट्य सुरू आहे, ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीतील त्यांचे पक्षप्रमुख अमित शहांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली, ‘‘हे लोक आमचा पक्ष फोडत आहेत. चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहेत. हे आम्ही सहन करणार नाही.’’ शिंदे यांच्या तक्रारीवर अमित शहा फसकन हसले. शिंदे यांनी विचारले, ‘‘साहब, आप क्यूं हस रहे हो.’’ यावर शहा म्हणाले, ‘‘कोण कोणाचा पक्ष फोडत आहे? मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे, भाजपने फोडाफोडी करून बनवला. तुम्ही फुटलात. आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली म्हणून तुम्ही ‘पक्ष’ वगैरे भाषा वापरत आहात. तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपची उपशाखा आहे.
शिंदेजी, आप क्रोनॉलॉजी समझ लीजिए. पैसे वाटून माणसे फोडण्यात तुमचा हातखंडा आहे. चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. आप मुंबई जाओ और रवींद्र चव्हाण के साथ बैठकर चाय पिओ. उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका.’’ शहा-शिंदे यांच्यामधला हा संवाद मनोरंजक आहे. आता शिंदे म्हणतात, ‘‘त्यांची दिल्लीवारी यशस्वी झाली व आपला सन्मान राखण्याचा शब्द शहा यांनी दिला.’’ ही शिंदे यांची बतावणी आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
भाजपने एक ‘पक्ष’ निर्माण केला आणि त्याला संपवण्याची तयारी आता भाजपनेच सुरू केली आहे. शिंदे गटातले किमान 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झाले आहे. भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ करून बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली. त्या फुटीचे सूत्रधार हेच शिंदे होते. आता दुसऱ्या ‘ऑपरेशन लोटस’मध्ये शिंदे गटावरच घाव घालणे सुरू आहे. शिंदे यांचा पक्ष म्हणजे बुडबुडे आहेत. अमित शहा यांनी निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टाच्या संगनमताने शिंदे यांना शिवसेना हा पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह दिले. शिंदे यांनी शिवसेना फोडताना जी तलवार वापरली, त्याच तलवारीने आता त्यांचा घात होत आहे.