नोटेवर फोटो कोणाचा हवा यासाठी शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही, नोटांवर कोणाचा फोटो हवा तर मी सांगेन..!
मुंबई : मागील दोन दिवसांपासून भारतातील चलनी नोटा आणि त्यांच्यावर असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा फोटो यावरून बराच वाद सुरू झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या एका मागणीमुळे या सगळ्या वादाला सुरुवात झाली. मुळात केजरीवाल यांनी ही मागणी गांभीर्याने केली नसून मोदी सरकारवर खोचक शब्दांत टोला लगावण्यासाठी त्यांनी या मागणीचा वापर केला. मात्र, त्यानंतर भारतीय चलनी नोटांवर गांधीजीं ऐवजी अजून कुणाकुणाचे फोटो असायला हवेत, याची अहमहमिकाच राजकीय नेतेमंडळींमध्ये लागली. मग देवी-देवतांच्या फोटोंपासून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोपर्यंत हा वाद येऊन पोहोचला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवरील फोटोंबाबत केलेल्या मागणीनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीही प्रतिक्रिया देत आपली इच्छा व्यक्त केली आहे. परब म्हणाले की, नोटेवर फोटो कोणाचा हवा यासाठी शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही. शिवसेना गरिबांचा पक्ष आहे त्यामुळे असल्या भानगडीत शिवसेना सहसा जात नाही. परंतु मला जर विचाराल की, नोटांवर कोणाचा फोटो हवा तर मी सांगेन बाळासाहेब ठाकरेंचा असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं जर प्रत्येकाला वाटत असेल, तर मी तर शिवसेनेचा आहे. मला तर असंच वाटेल की बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे