बीड : वृत्तसंस्था
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या २० ऑक्टोबर २०२३ रोजी तहसील कार्यालयासमोर झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत असून, लवकरच धक्कादायक नावे उघड होऊ शकतात, असा दावा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या विधानामुळे परळी शहरात खळबळ उडाली आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त केले होते. संशयितांवर करण्यात आलेल्या नार्को टेस्ट (Narco Test) आणि ब्रेन मॅपिंग (Brain Mapping) चाचण्यांचे अहवाल अधिकृतपणे एसआयटीकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या तांत्रिक चाचण्यांतून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे सांगितले जात आहे. अहवाल आल्यानंतर तो न्यायालयात सादर केला जाणार असून, त्यानंतर पोलीस अधिकृतरीत्या काही नावे जाहीर करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बीड येथे पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “ही कायदेशीर प्रक्रिया आहे. अहवाल कोर्टात सादर झाल्यानंतरच पुढील कारवाई होईल. काही नावे मलाही माहिती आहेत; मात्र तपासात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ती नावे सध्या उघड करणार नाही.” त्यांनी पुढे दावा केला की, “या प्रकरणात इतकी मोठी नावे समोर येतील की संपूर्ण परळी हादरून जाईल.”
महादेव मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा आरोप केला होता. सुरुवातीपासूनच या प्रकरणात राजकीय लागेबांधे असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने एसआयटी स्थापन केली. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात लक्ष घातल्याचे सांगितले जात असून, तपास यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत आहे.
घटनेला दीड वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी मुंडे कुटुंब अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आता नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग अहवालांमधून नेमके कोणाचे ‘पितळ’ उघड पडते, याकडे संपूर्ण परळीकरांचे लक्ष लागले आहे. तपास अंतिम टप्प्यात असताना पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठी घडामोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.