मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेत असतांना आता जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरवर जालना पोलिसांकडून तडीपारची कारवाई करण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे. एकीकडून सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगतात, आम्ही मराठा आंदोलकांच्या केसेस मागे घेणार आहोत आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांना नोटीस दिल्या जात आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर मी सोडणार नाही फडणवीस साहेब. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचे काम केले तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही. प्रामाणिक आंदोलकांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, त्यांच्यावर तुम्ही प्रेशर आणू शकत नाही. आमची अशी इच्छा होती की, मराठ्यांनी सांगावे आणि फडणवीस यांनी करावे, अशी आमची भोळीभाबडी इच्छा होती. बेमानी आणि गद्दारी हा शब्दाचा शिक्का तुझ्यावर पडू देऊ नको, आम्ही भोळे लोक आहोत, त्यामुळे सर्व हाताने मदत केली. तू रंडकुंडीला आला होता, तुला ही गादी कधीच मिळू शकत नव्हती. या राज्यात मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही. तुझा भागले म्हणून जर तू उलटणार असला, हे तुझ्यासाठी घातक असणार आहे, देवेंद्र फडणवीसांनी चूक सुधारावी, त्यांनी दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात. आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.