मुंबई : वृत्तसंस्था
महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनात बोलताना भाजपचे आ.नीतेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मशिदीत घुसून एकेकाला मारेल, असे ते म्हणाले होते. या प्रकरणी नीतेश राणे तांच्यावर नगर व श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नीतेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले, राणे हे मशिदीत घुसून मारण्याची भाषा करत असेल तर आम्ही सुद्धा बांगड्या भरल्या नाहीत. मुंबईत येऊ तेव्हा राणेंना एमआयएमची ताकद दाखवू, असे आव्हान त्यांनी केले आहे. पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, रामगिरी महाराजांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नीतेश राणे यांना भाजप संरक्षण देत आहेत. दोघांनाही मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलण्यासाठी सोडण्यात आले आहे.
पुढे इम्तियाज जलील म्हणाले, हिंदूंचे रक्षण करू असे सांगणारे राणे पोलिस संरक्षणात वावरत आहेत. ते काय कोणाचे संरक्षण करणार. सरकारच्या भरोशावर ते उड्या मारत आहेत. त्यामुळे त्यांची हिंमत वाढत चालली आहे. आता ते पोलिसांनाही घबरत नाहीत. त्यांनी आरोप करण्याची पातळी देखील सोडली असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.
दरम्यान, नीतेश राणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी एमआयएमने पाच दिवसांचा सरकारला अल्टिमेटम दिला होता, तो आता संपला आहे. याबाबत इम्तियाज जलील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, सध्या राज्यात गणेशोत्सवाचे वातावरण आहे, त्यामुळे आम्ही शांत बसलो आहोत. आम्हाला धार्मिक तेढ निर्माण करायचा नाही तसेच राज्याची कायदा व सुव्यवस्था खराब करायची नाही. मात्र आम्ही मुंबईत नक्कीच धडक देणार आहोत. त्यावेळी राणे यांना आमची ताकद दिसेल.