सोलापूर वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील एकूण 11 विधानसभा मतदार संघातून तब्बल 150 उमेदवारांनी माघार घेतली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात एकूण 334 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते, त्यापैकी 150 जणांनी माघार घेतल्याने 184 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. मागील 2019 च्या निवडणुकीत 154 उमेदवार रिंगणात होते. यात त्यात 30 उमेदवारांची भर पडली आहे. सर्वाधिक 25 उमेदवार दक्षिणमध्ये, तर सर्वांत कमी 10उमेदवार मोहोळच्या रिंणगात असणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात एकूण 334 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. अनेक मातब्बर नेते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, त्यामुळे माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माघार कोण घेणार आणि निवडणुकीच्या रिंगणात कोण कायम राहणार, याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला होती.
सोलापूर दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक चाळीस उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी पंधरा जणांनी माघार घेतली असून जिल्ह्यात सर्वाधिक 25 उमेदवार सोलापूर दक्षिण मतदारसंघात कायम राहिले आहेत. याच मतदारसंघातून काँग्रेसचे प्रबळ इच्छुक माजी आमदार दिलीप माने यांना माघार घ्यावी लागली. मात्र, सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी मात्र आपला अर्ज कायम ठेवला आहे. याशिवाय महाविकास आघाडीचे अमर पाटील आणि महायुतीचे सुभाष देशमुख यांंच्यात प्रमुख लढत होणार आहे.
सोलापूर दक्षिणनंतर पंढरपूर मतदासंघातून 24 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. पंढरपूरमध्ये एकूण 38 उमेदवारी अर्ज आले हेाते. त्या पैकी 14 जणांनी माघार घेतल्याने 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंणगात उरले आहेत. याच मतदारसंघात महाविकास आघाडीत फूट पडली आहे. काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना एबी फार्म दिला आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे हे रिंगणात आहेत
करमाळ्यातून सोळा उमेदवारांनी माघार घेतली असून 15 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. करमाळा मतदारसंघात एकूण 31 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. विद्यमान आमदार संजय शिंदे हे पुन्हा अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांना माजी आमदार नारायण पाटील, शिवसेनेचे दिग्विजय बागल यांचे आव्हान असणार आहे.
माढ्यातून 17 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात 13 उमेदवार असणार आहेत. माढ्यातून विद्यमान आमदार बबनराव शिंदेंनी माघार घेतली असून त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. महायुतीकडून मीनल साठे, महाविकास आघाडीकडून विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे निवडणुकीतील प्रमुख उमेदवार असणार आहेत.
बार्शीत मतदारसंघात ३१ उमेदवारी अर्ज आले होते, त्या पैकी अकरा जणांनी माघार घेतली असून प्रत्यक्ष २० उमेदवार रिंगणात असणार आहेत. बार्शीत पारंपारिक प्रतिस्पर्धी विद्यमान आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.
मोहोळ मतदारसंघातून १७ उमेदवारांनी माघार घेतली असून १० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आपला उमेदवार बदलावा लागला. सिद्धी रमेश कदम यांना जाहीर केलेली उमेदवारी बदलून राजू खरे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना विद्यमान आमदार यशवंत माने आणि अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यांच्याशी होणार आहे.
सोलापूर शहर उत्तरमधून सहा जणांनी माघार घेतल्याने २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. एकूण २६ अर्ज या मतदारसंघासाठी आले होते. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी महापौर महेश कोठे विरुद्ध माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांच्यात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून १९ उमेदवारांनी माघार घेतल्याने वीस उमेदवार रिंगणात उरले आहेत. यात महायुतीकडून देवेंद्र कोठे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे चेतन नरोटे, माकपकडून माजी आमदार नरसय्या आडम यांचा समावेश आहे.
अक्कलकोट मतदारसंघात एकूण १५ उमेदवारी अर्ज आले होते, त्यापैकी केवळ तिघांनी माघार घेतल्याने १२ उमेदवार निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. या मतदारसंघात माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे आणि विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात दुरंगी सामना होणार आहे.
सांगोल्यात १९ उमेदवारांनी माघार घेतली असून १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दीपक साळुंखे, तर महायुतीकडून शहाजी पाटील निवडणूक लढवत आहेत. शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख हेही निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
माळशिरसमध्ये २५ अर्ज आले होते, त्या पैकी १३ जणांनी माघार घेतली असून १२ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. माळशिरसमध्ये महाविकास आघाडीचे उत्तम जानकर, तर महायुतीकडून विद्यमान राम सातपुते यांच्यात थेट लढत होणार आहे.