सोलापूर विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन यशस्वीरीत्या पूर्ण! समितीच्या अध्यक्षांनी सोपविला कुलगुरूंकडे अहवाल
सोलापूर, दि.22- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे दुसरे नॅक मूल्यांकन शनिवारी यशस्वीरीत्या पूर्ण झाले. नॅक तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष केरळ येथील कन्नूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अब्दुलकादर एम. के. यांनी प्रत्यक्ष पडताळणी अहवाल नॅक कार्यालयास ऑनलाइन पाठविला. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडेही एक स्वतंत्र अहवाल सुपूर्द करून नॅक मूल्यांकन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे जाहीर केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ दुसऱ्या नॅक मूल्यांकनास सामोरे गेले. एसएसआर आणि डीव्हीव्ही बंगळुरूच्या नॅक कार्यालयाने स्वीकारल्यानंतर नॅकच्या तज्ज्ञ समितीकडून गुरुवार, दि. 20 ते शनिवार, 22 जानेवारी 2022 दरम्यान विद्यापीठात प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया पार पडली. गुरुवार आणि शुक्रवारी विद्यापीठ संकुलातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व कार्यालयांना भेटी देऊन समिती सदस्यांनी चर्चा व प्रत्यक्ष पाहणी केली. शनिवारी विद्यापीठाच्या रंगभवन येथील अभ्यास केंद्रास भेट देऊन तेथील परिसराची व अभ्यास कक्षाची पाहणी केली. त्याचबरोबर यशोधरा हॉस्पिटल येथे जाऊन कौशल्य विकास केंद्राच्या अभ्यासक्रमाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि आयक्यूएसी विभागाचे संचालक डॉ. व्ही. बी. पाटील यांच्याशी चर्चा केली.
तीन दिवस केलेल्या पडताळीचा अहवाल समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनी या नॅक कार्यालयास ऑनलाइन पाठवून दिला. त्यानंतर एक्झिट मिटिंग होऊन कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्याकडे एक अहवाल सुपूर्द केला. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. अब्दुलकादर यांनी अल्पकालावधीत विद्यापीठाने चांगली झेप घेतल्याचे नमूद करून विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्राचे विविध कोर्सेस, टीव्ही आणि रेडिओ स्टुडिओ तसेच समाजातील विविध घटकांशी असलेले शैक्षणिक संबंध हे विद्यापीठाचे बलस्थान असल्याचे सांगितले. समन्वयक शाहिद रसूल यांनीही विद्यापीठास चांगले भविष्य असल्याचे सांगितले. प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार, वित्त व लेखा अधिकारी श्रेणिक शहा यावेळी उपस्थित होते.