ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर विद्यापीठाचा विक्रमी वेग! ४०५ पैकी ११० परीक्षांचे निकाल अवघ्या काही दिवसांत जाहीर !

सोलापूर : प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबर सत्रातील परीक्षांचे निकाल जाहीर करण्यामध्ये राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत विक्रमी गती दाखवली आहे. एकूण ४०५ पैकी ११० अभ्यासक्रमांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले असून, परीक्षा संपल्यानंतर २ ते ७ दिवसांत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न विद्यापीठाकडून सुरू असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दिली.

नियमांनुसार परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र या नियमाचे वारंवार उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी पूर्वीपासून होत आल्या होत्या. यावर उपाय म्हणून यंदा परीक्षा सुरू असतानाच पेपर तपासणीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात आली. त्यामुळे निकाल जाहीर करण्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

यापूर्वी पाच सॉफ्टवेअरमधून मिळणारे डेटा एकत्र न आल्यामुळे परीक्षा व निकाल प्रक्रियेत अनेक अडचणी येत होत्या. मात्र यंदा इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टिम हे नवीन ऑनलाइन सॉफ्टवेअर प्रभावी ठरले असून, निकाल प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे, असे डॉ. अंधारे यांनी सांगितले.

पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड विद्यापीठांमध्ये नुकत्याच सत्र परीक्षा सुरू झाल्या असताना सोलापूर विद्यापीठाने १५ ते २० दिवसांत तब्बल १०० हून अधिक निकाल जाहीर करून राज्यातील विद्यापीठांमध्ये आघाडी घेतली आहे. परीक्षा दरम्यान काही तांत्रिक अडचणी, यंत्रणांचे प्रश्न, तसेच केंद्रांवर झालेल्या त्रुटींमुळे विद्यार्थी आणि पालकांत नाराजीचे वातावरण होते. तरीही या अडचणींवर मात करून निकाल तातडीने लावण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे. सत्राच्या वेळापत्रकाचे नियोजन, पुनर्परीक्षा व पुढील टप्प्यांच्या तयारीसाठी निकाल वेळेत लागणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे विद्यापीठाच्या या जलद प्रक्रियेचे अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांकडून स्वागत केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!