बेळगाव : वृत्तसंस्था
अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कारणाने गुन्हेगारीच्या घटना घडत असतांना एक खळबळजनक बातमी बेळगाव येथून समोर आली आहे. प्रेमविवाह केलेल्या जावयाने सासूचा क्षुल्लक कारणातून भोसकून खून केला आहे. खुनाची घटना मंगळवारी सकाळी 11.40 वाजता वडगावातील रयत गल्लीत घडली. त्याबद्दल जावयासह त्याचे आई-वडील अशा तिघांना अटक करण्यात आली असून, तिघांचीही रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. रेणुका श्रीधर पाडमुखे (वय 43, रा. कल्याणनगर, वडगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा जावई शुभम दत्ता बिर्जे (वय 24, मूळ रा. मारुती गल्ली, खासबाग सध्या रा. रयत गल्ली, वडगाव) शुभमची आई सुजाता (वय 44) व वडील दत्ता मल्लाप्पा बिर्जे (वय 50, दोघेही रा. मारुती गल्ली, खासबाग) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, सात महिन्यांपूर्वी शुभमने रेणुका यांची मुलगी छाया हिच्याशी प्रेमविवाह केला. शुभम हा हातमागावर जाण्याबरोबरच अन्य किरकोळ कामे करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. शिवाय तो वारंवार भांडण काढत असल्याने या लग्नाबाबत रेणुका खुश नव्हत्या. सासूने पैसे मागताच शुभमने त्यांच्याशी भांडण काढले. भांडणानंतर तो रागाने घरातून निघून गेला. खासबागूा जाऊन त्याने आपल्या आई-वडिलांना बोलावून आणले. तिघेजण आल्यानंतर रेणुका आणखी संतापल्या. तुमच्या मुलाकडे दारू पिण्यासाठी पैसे आहेत आणि बायकोला दवाखान्यासाठी पैसे नाहीत, असे म्हणत त्यांनी वाद घातला. त्यावरून तिघेही रेणुका यांच्यासमवेत भांडत होते. त्याचवेळी शुभमने चाकू बाहेर काढला. शुभमचे आई-वडीलही हिला जिवंत सोडू नकोस, असे म्हणत मुलाला गुन्ह्यासाठी प्रवृत्त करत होते. रागाच्या भरात असलेल्या शुभमने तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणत सासू रेणुका यांच्या पोटात चाकूने सपासप वार केले. त्या गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना दोन तासांनी त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
मृताची मुलगी व हल्लेखोराची पत्नी छाया शुभम बिर्जे (वय 20, रा. रयत गल्ली, वडगाव) हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हल्लेखोर जावयासह त्याच्या आई-वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यांना रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी पुढील तपास करीत आहेत.
लग्नानंतर शुभम पत्नी छायाला घेऊन रयत गल्ली वडगाव येथे भाडोत्री घरात राहात होता. चार दिवसांपूर्वी शुभमची पत्नी छाया आजारी पडली. परंतु, तिला दवाखान्याला न नेता शुभम दारू पिऊन फिरत होता. मुलगी आजारी असल्याने आई रेणुका यांनी तिला दवाखान्यात नेऊन उपचार केले. तिच्यासाठी ती जेवणदेखील करून घेऊन येत होती. मंगळवारी ती नेहमीप्रमाणे जेवण बनवून मुलीकडे गेली. यावेळी शुभम हा मद्यप्राशन करून घरी बसला होता. मुलीच्या उपचारासाठी 3 हजार रुपये खर्च केले आहेत ते मला दे, असे सासू रेणुका यांनी जावई शुभमला सांगितले यातूनच भांडण सुरु झाले