नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच सर्वच पक्षांनी तयारी केली असून कॉंग्रेसने देखील भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली आहे. यात बुधवारी 31 जानेवारी रोजी बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. मालदा दौऱ्यावर असताना राहुल यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले की, काही अज्ञात लोकांनी राहुल यांच्या कारवर दगडफेक केली, त्यामुळे कारची मागील काच फुटली. अधीर रंजन म्हणाले की, असे हल्ले आम्ही मान्य करणार नाही. या हल्ल्यात राहुल यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
आज ही यात्रा पुन्हा एकदा बिहार सोडून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे. या यात्रेचा हा 16 वा दिवस आहे. 29 आणि 30 जानेवारीला दोन दिवस बिहारमध्ये मुक्काम केल्यानंतर ही यात्रा मालदा येथे पोहोचत आहे. यानंतर 1 फेब्रुवारीला मुर्शिदाबादला पोहोचेल. दोन्ही जिल्हे काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जातात. बुधवारी सकाळी राहुल यांनी कटिहारमध्ये रोड शो केला.
25 जानेवारी रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास ही यात्रा पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यातील बक्षीरहाट येथे पोहोचली होती. यात्रेला दोन दिवसांचा ब्रेक देण्यात आला होता. 28 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजता जलपायगुडी येथून हा प्रवास पुन्हा सुरू करण्यात आला. सायंकाळी ही यात्रा सिलीगुडीला पोहोचली. रात्रीच्या विश्रांतीनंतर 29 फेब्रुवारीला उत्तर दिनाजपूरमधील इस्लामपूरमार्गे दुपारी बिहारच्या सीमेत प्रवेश केला.