पुणे : वृत्तसंस्था
आज (दि.८) पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पार पडला. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, “मी एकदा एका भगिनीला भेटलो. तिला विचारलं, ‘एक मुलगी इथे आहे, दुसरी कुठे आहे?’ तर ती म्हणाली, ‘आईकडे घरी ठेवली आहे.’ दोन मुली असतानाही ती भगिनी पुन्हा गरोदर दिसली. मी तिला विचारल्यावर ती म्हणाली, ‘आहे पोटात…’ तेव्हा मी तिला हात जोडून म्हणालो, ‘आता बास करा!'”
आपला दुसरा अनुभव सांगताना ते पुढे म्हणाले, “मी आणखी एका महिलेला विचारले की तुम्हाला किती मुलं आहेत? ती म्हणाली, ‘तीन आहेत, आता चौथं काय होईल माहिती नाही.’ आता तुम्हीच सांगा, जर आपण लोकसंख्या वाढवण्याचा कार्यक्रम असाच व्यवस्थित पार पाडायचा ठरवला, तर उद्या तुम्ही जरी सरकारमध्ये प्रमुख झालात तरी ही गोष्ट हाताळणे अशक्य आहे.”
अजित पवार यांनी यावेळी लोकप्रतिनिधींना लागू नसलेल्या दोन अपत्यांच्या नियमावरही स्पष्टपणे भाष्य केले. ते म्हणाले, “आम्ही नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी दोन अपत्यांचा कायदा केला आहे. पण लोक आम्हाला विचारतात की, ‘तुम्ही आमच्यासाठी कायदा केला, पण खासदार आणि आमदारांना का नाही? यावर आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “हे आमच्या हातात नाही, नाहीतर तिथेही दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना निवडणुकीला उभे राहता येणार नाही, असा कायदा आम्ही नक्कीच केला असता. पण ते आम्हाला जमले नाही. भविष्यात कधी संधी मिळाली आणि अधिकार हातात आले, तर त्याचा नक्की विचार करू,” असे सूचक विधानही त्यांनी केले.