अक्कलकोट : मारुती बावडे
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या म्हणीचा प्रत्यय अक्कलकोट तालुक्यातील चिंचोळी मैं येथील शेतकऱ्याकडे पाहून येत आहे. त्याचे कारण म्हणजे इच्छाशक्ती जर असेल तर या जगात अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही.अक्षरशः मुरमाड जमिनीवरती बोअर मारून चिंचोळी मैं येथील युवा शेतकरी महेश गड्डीकर यांनी खूप मेहनत घेऊन अडीच एकारात आपली द्राक्ष बाग पिकविली आहे आणि केवळ पिकवलीच नाही तर त्याचे विक्रम हे उत्पादन सुद्धा घेतले आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांसाठी आदर्श शेतकरी ठरत आहेत.हेक्टरी ४० टन उत्पादन घेतल्यामुळे हा विषय या परिसरात चर्चेचा ठरला आहे.त्याला प्रति किलो ५४ रुपये दर मिळाला आहे.यातून या शेतकऱ्याला २० लाख रुपयेचे उत्पन्न मिळाले आहे.
तसे पाहिले तर अक्कलकोट तालुक्यात द्राक्ष बागायत शेतकरी हे खूप कमी आहेत. या पिकाबाबत म्हणावे तशी जागृती किंवा अभ्यास नसल्यामुळे बरेच शेतकरी धाडस करत नाहीत.पण गड्डीकर यांनी धाडस करत आधुनिक शेतीच्या सर्व साईटवर जाऊन यू ट्यूबवर अभ्यास करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. साधा सोनका या जातीच्या द्राक्षाची लागवड करून भरघोस उत्पादन घेतल्याने आजूबाजूचे शेतकरी या फडाला आवर्जून भेट देत आहेत. द्राक्षाची लागवड करताना त्यांना अक्कलकोट सारख्या दुष्काळ ग्रस्त भागात पुरेशी पाण्याची सोय नाही याची पुरेपूर जाणीव होती.पण योग्य नियोजन,रासायनिक खताऐवजी शेणखत,जीवामृत या सारख्या खताचा वापर करून ड्रिप तसेच शेणखत, गोमुत्र, गूळ यापासून तयार केलेल्या जीवामृत द्वारे हे उतपादन घेतले आहे.यात त्यांनी जैविक घटकाचा वापर पुरेपूर केला आहे.यात पहिल्यांदा त्यांनी मातीचा अभ्यास केला. घरातील लोकांनीच पूर्ण वेळ शेतात काम करून कामगार तुडवडा वर मात केली.
यंदा वर्षात १०० द्राक्षे बागायतीमध्ये उत्पादन गुणवत्तामध्ये त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे आणि दरही भरघोस प्राप्त झालेला आहे.या यशा मागे स्वतःच कारणीभूत आहेत.विशेष म्हणजे कष्टामागे असलेला त्यांचा प्रामाणिकपणा, आत्मविश्वास,कष्ट करण्याची तयारी, पिकांना काय आहे यापेक्षा काय लागतेय याचा अभ्यास व कामात योग्य नियोजन यामुळे पिकही चांगले आले आहे,
असे ते आवर्जून शेतकऱ्यांना सांगतात.
नोकरी सोडून शेती केली
पूर्वी मी पुण्यात दहा-बारा हजारच्या नोकरीवर कामाला होतो. एक दिवशी मी शेतात काहीतरी नवीन करून उत्पादन घेण्याचा संकल्प केला. माझे शिक्षण पदवी पर्यंत झाले आहे पण युट्युबचा वापर करून द्राक्ष शेती केली आणि त्याचा फायदा मला पहिल्याच वर्षी झाला.
महेश गड्डीकर