बीड : प्रतिनिधी
ऊसदराच्या प्रश्नावर जिल्ह्यातील सर्वच शेतकरी संघटना एकवटल्या असून सोमवार, दि. २४ रोजी होणाऱ्या बेमुदत चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल १०० हून अधिक गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी टायर जाळून संताप व्यक्त केला. ऊस दर वाढीसह इतर मागण्यांसाठी कारखानदार आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
अखिल भारतीय किसान सभा, युवा शेतकरी संघर्ष समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार, शेतकरी संघटना यांसह विविध चळवळींतील पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार, मुकदम आणि वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने एकत्र आल्याने जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न चिघळला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २४ रोजी माजलगाव येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन होणार आहे.
रविवार, दि. २३ रोजी झालेल्या टायर जाळण्याच्या आंदोलनातून शेतकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त करत ऊस कारखानदारांना स्पष्ट इशारा दिला. प्रशासकीय पातळीवर चर्चेतून तोडगा काढण्याची संधी कारखानदारांनी दवडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. घामाच्या योग्य दामासाठी सुरू झालेल्या या लढ्यात जिल्ह्यातील ऊस उत्पादकांपासून शेतकरी पुत्रांपर्यंत सर्वांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला.
२४ रोजी होणाऱ्या बेमुदत चक्काजाम आंदोलनात शोषणाविरोधात आवाज बुलंद करून रास्त हमीभाव मिळवण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन ऊस उत्पादक संघर्ष समितीने केले आहे.