मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात आज रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून देशभरातील राम मंदिरांमध्ये रामभक्तांचा सागर लोटला आहे. ठिकाठिकाणी राम नवमीचे विविध कार्यक्रम होत आहे. परंतु अयोध्येत राम मंदिरात देशभरातील भाविक आले आहेत. रामलल्लाचे दर्शन ‘याची देही याची डोळा’ घेणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांची पारणे रामनवमीच्या दिवशी रविवारी फिटली. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा टीळा सूर्यकिरणांनी लावण्यात आला. त्यावेळी रामलल्लाचे दर्शन हजारो भाविकांनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो भक्तांनी घेतले. चार लेन्स आणि चार मिररच्या मदतीने सूर्य किरण रामलल्लाच्या कापळीपर्यंत आले. त्यावेळी वैदिक मंत्रोच्चारामुळे मंदिर परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. भक्तांनी भगवान राम आणि माता जानकी यांचा जयजयकार केला.
रविवारी पहाटेपासून अयोध्येतील राम मंदिरात कार्यक्रमांना सुरुवात झाली. रामलल्लाला सूर्य टिळा लावण्याच्या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. देशातीलच नव्हे तर परदेशातूनही लोक राम मंदिरात पोहोचले आणि त्याचे साक्षीदार झाले. राम मंदिरात येणाऱ्या भाविकांवर ड्रोनचा वापर करून सरयू पाण्याचा वर्षाव करण्यात आला. अयोध्येत सर्वत्र रामाचा जयघोष होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक राम मंदिरात पोहोचले आहे. सायंकाळी उशिरा अयोध्येतील सरयूच्या घाटांवरही दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. या ठिकाणी दीड लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत.
अयोध्येत सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी सांगितले की, अयोध्येला वेगवेगळ्या झोन आणि सेक्टरमध्ये वाटण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी जड वाहनांना अयोध्येत प्रवेश बंद केला आहे. ही सर्व वाहने पूर्वांचल एक्स्प्रेस वेवरुन जात आहे. महाकुंभाप्रमाणे पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
भाविकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी राम मंदिर आणि हनुमानगढीसह प्रमुख ठिकाणी सावली आणि मॅटची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व प्रमुख ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने 14 ठिकाणी तात्पुरती प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली आहेत.