मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड येथील सरपंच देशमुख खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आल्यानंतर सर्वच विरोधक आता मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत असतांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवत त्यांची व नैतिकतेची केव्हा भेटच झाली नसल्याचा दावा केला. सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या व्यक्तीला (वाल्मीक कराड) एवढे अमानुष वागण्याचा अधिकारच कुणी दिला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीने 1500 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात वाल्मीक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून ही माहिती समोर आली असून, संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा, असा मेसेज वाल्मीक कराडने विष्णू चाटेमार्फत सुदर्शन घुलेला दिला होता, हे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे वाल्मीक कराडचा पाय पुरता खोलात गेल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या अमानुष पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली, ते पाहता मला या प्रकरणी काहीही आश्चर्य वाटत नाही. या व्यक्तीला एवढे अमानुष वागण्याचा अधिकारच कुणी दिला? अर्थातच कुणीतरी मोठा माणूस मागे असल्याशिवाय एखाद्या जिल्ह्यात एवढा अंधाधूंद चालत नाही. या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली हे दुर्दैव आहे. घटना घडून 75 दिवस झाले तरी या प्रकरणातील कृष्णा आंधळे नामक आरोपी अजून पोलिसांना सापडला नाही. तो कुठे फरार झाला? सापडत कसा नाही? तो महाराष्ट्राबाहेर गेला असेल तर या सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाशी संपर्क साधला आहे का? या प्रकरणातील सातवा खुनी 70-75 दिवस फरार कसा राहू शकतो असा प्रश्न या सरकारला पडत नाही का?
पत्रकारांनी यावेळी या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकच्या मुद्यावर राजीनामा देऊ नये का? असा प्रश्न केला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुरेश धस यांनी यापूर्वीच यांची (धनंजय मुंडे) व नैतिकतेची केव्हा भेटच झाली नसल्याचे सांगितले आहे. आता जसजसे दिवस जात आहेत, तसतसे सुरेश धस यांनी जे सांगितले ते खरे वाटत आहे. यांची व नैतिकतेची आतापर्यंत केव्हा भेटच झाली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आपण कोणतीही अपेक्षा करू शकत नाही. बीडमध्ये कोणता गुन्हा व्हायचा राहिलाय? येथे खून, खंडणी, पीकविमा घोटाळा, भ्रष्टाचार, हार्वेस्टर फसवणूक, कौटुंबिक हिंसाचार आदी सर्वच गोष्टी झाल्या आहेत. आणखी कोणता गुन्हा येथे करण्यासाठी राहिला आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. मी कधीही खोटेनाटे बोलून राजकारण करत नाही. आवादा कंपनीने खंडणीची तक्रार दाखल केली, तेव्हाच या हैवानांना आवरले असते तर हा दिवसच उगवला नसता. आमच्या वैभवीचे वडील तिच्याबरोबर असते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.