शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार : आ.कल्याणशेट्टी
गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडविण्याचे कार्य त्यांच्या हातून घडते. त्यामुळे शिक्षक हे फक्त ज्ञानदाते नसून समाज घडवणारे स्तंभ आहेत, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित आचार्य दादासाहेब दोंदे गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात तालुक्यातील बावीस गुणवंत शिक्षक, एक पंचायत समिती कर्मचारी, एक केंद्रप्रमुख अशा एकूण २४ गुणवंत व्यक्तींना आणि पाच आदर्श शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करताना सांगितले की,आजच्या डिजिटल युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातही शाळांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, चारित्र्य आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव निर्माण करण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की,शिक्षकांनी फक्त पाठ्यपुस्तकांपुरते शिक्षण मर्यादित ठेवू नये, तर विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्ये आणि सामाजिक संवेदनशीलतेची बीजे रोवावीत. हेच खरे शिक्षण होय.यावेळी
त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अधिक नवोन्मेषी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.या समारंभाला म.नि.प्र. डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी, महेश हिंडोळे, प्रशांत अरबाळे, शिवानंद भरडे, वीरभद्र यादवाड, अपर्णा मानकोसकर, शिवाजी पाटील, राजशेखर उंबराणीकर, बाबुराव चव्हाण, अशोक पोमाजी, रेवणसिद्ध हतुरे, सुरेश शटगार, गुरुसिद्ध कोरे, बसवराज खिलारे, महिबुब सवार यांच्यासह संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुंडलिक कलखांबकर यांनी केले, सूत्रसंचालन दत्तात्रय सावंत यांनी तर आभार मंजुनाथ भनगुणकी यांनी मानले. या समारंभाला तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षणक्षेत्रातील योगदानाची दखल घेत अशा प्रकारे सन्मानित करण्यात येणे ही केवळ गौरवाची बाब नसून इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणारी संकल्पना असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे अक्कलकोट तालुक्यातील शैक्षणिक कार्यास नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थित शिक्षकांमध्ये व्यक्त होत होती.