नाशिक : वृत्तसंस्था
अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक निवृत्ती नजन (४८) यांनी मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यातच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. त्यात ते जागीच गतप्राण झाले. नजन यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक नजन हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे पोलीस ठाण्यात ड्युटीवर हजर झाल्यानंतर ते त्यांच्या केबिनमध्ये बसले होते. पोलीस ठाण्यात सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी सुरू होती. त्याच दरम्यान फटाक्याच्या दबक्या आवाजासारखा ध्वनी पोलिसांनी ऐकला. मात्र पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या पत्र्यांचा तो आवाज असावा, असा पोलिसांचा समज झाला. त्यानंतर नजन यांना हजेरीसाठी बोलावण्याकरिता झोले हे नजन यांच्या केबिनमध्ये गेले.मात्र तेथे नजन हे खुर्चीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. नजन यांनी स्वतःच डोक्यात गोळी झाडल्याचे निदर्शनास येताच पोलिसांची धावपळ उडाली. या घटनेची माहिती तातडीने वरिष्ठांनी कळवण्यात येऊन दुसरीकडे पोलिसांनी धावपळ करीत नजन यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.