ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल : तर आपल्याला लढावे लागेल आणि जिंकावेच लागेल !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज निर्धार मेळावा पार पडला असून या मेळाव्यात बोलताना वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मुंबईला गुजरातच्या नाही, तर अदानीच्या घशात घालणे सुरू आहे. मुंबई महाराष्ट्राची ठेवायची असेल, तर आपल्याला लढावे लागेल आणि जिंकावेच लागेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील यश आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवावरही भाष्य केले.

शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपवाल्यांनी व्होटर फ्रॉड नसता केला, तर आपण विधानसभा निवडणुकीत जिंकलो होतो. हा व्होटर फ्रॉड देखील आपण लोकांसमोर आणणार आहोत. एक महिन्यांपूर्वी संजय राऊत, राहुल गांधी, सुप्रिया सुळे या तिघांनी हा झालेला व्होटर फ्रॉड दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सर्वांसमोर आणलेला आहे. जनतेने आपले मत जे महाविकास आघाडीला दिले होते, ते त्यांनी फिरवले कसे हे आपण सांगायला पाहिजे. भाजपवाल्यांनी खोटी मतदार नोंदणी करून जनतेचे मत खाल्ले कसे? हे आपल्याला लोकांसमोर आणावे लागणार आहे. ठीक आहे, आपला पराभव झाला, हे आपण तात्पुरते तरी मान्य करू.

मुंबईची अवस्था आज बिकट झाली आहे. मुंबई आपल्या हातातून जाता कामा नये, असे आपले ध्येय आहे. मुंबई आपल्या हातातून जर गेली, तर ही मुंबई महाराष्ट्रापासून तुटेल. आता कदाचित मुंबई गुजरातच्या घशात नाही, तर फक्त आणि फक्त अदानीच्या घशात घालतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ही मुंबई आपल्याला आपली तसेच महाराष्ट्राची ठेवायची असेल, तर आपल्याला लढणे गरजेचे आहे. आपल्याला जिंकणे गरजेचे आहे. आपल्याला जात-पात-धर्म आणि पक्ष विसरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

2022 मध्ये या गद्दारांनी आपले सरकार पाडले. या महाराष्ट्राला त्यांनी गद्दारीची, खोकेबाजाची, धोकेबाजीची कीड लावली. आपले सरकार पाडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण यावेळी जेव्हा त्यांचे सरकार बनत होते, सगळे सत्ताधारी बाकावर बसले होते, ते सुद्धा तेवढेच शॉकमध्ये होते. आपले सरकार आले कसे यावर त्यावर त्यांना विश्वास बसत नव्हता. सगळे एकमेकांकडे बघत होते. मला वाटले मी पडतो, त्याला वाटलं तो पडतोय, असे ते वातावरण होते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

आताची भाजप ही नवीन भाजप आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुंबईत प्रकाश मेहता, राजपुरोहित यांची जी भाजप होती, ती जुनी होती. आजची भाजप ही कॉन्ट्रॅक्टर लोकांची आहे, ती मूळ भाजप नाहीच, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. जुन्या भाजपमधील लोक आम्हाला सांगतात, आदित्यजी आमचे सरकार आले कसे? हे आम्हालाही माहीत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मंत्रालयात तुम्ही गेलात, तर वातावरण असे आहे की, या सरकारला पाच वर्षे होऊन गेलेले आहेत. सगळे काही हळू चाललेले आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!