ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाकरे संतापले : दौरा सोडून मुंबईला परतले

पुणे : वृत्तसंस्था

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले होते. मात्र, या बैठकीला मनसे पदाधिकारी उशिरा पोहोचल्याने राज ठाकरे यांचा राग अनावर झाला आणि ते थेट पुणे दौरा सोडून तडकाफडकी मुंबईकडे रवाना झाले.

पुण्यात विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी दुपारी अडीच वाजता बोलावण्यात आली होती. दोन ते सव्वादोन वाजता पदाधिकाऱ्यांना आणि विभागप्रमुखांना पक्ष कार्यालयात बोलावण्यात आले होते. राज ठाकरेदेखील सव्वादोन वाजता पक्ष कार्यालयात पोहोचले होते. अडीच वाजता बैठक सुरू होणार होती. मात्र, या शहरातील कार्यालयात मुख्य पदाधिकारी नव्हते. ज्यांना बैठकीला बोलवण्यात आले होते ते विभागप्रमुखही पोहोचले नव्हते. त्यामुळे राज ठाकरे चांगलेच संतापले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विधानसभेच्या प्रत्येक प्रमुखाला या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. या सगळ्यांबरोबर राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार होते. त्यामुळे पुणे मनसेसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण होती. राज ठाकरे आल्याचे माहीत झाल्यानंतर सगळ्याच पदाधिकारी आणि विभाग प्रमुखांची तारांबळ उडाली. शहरातील विविध भागातील पदाधिकारी कार्यालयापर्यंत कसेबसे पोहोचले. राज ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला होता. सव्वातीन वाजता राज ठाकरे अचानक ही बैठक सोडून मुंबईकडे रवाना झाले. राज ठाकरे याप्रकरणी संबंधितांकडून खुलासा घेऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पुण्यातील मनसेच्या संघटनेत गटबाजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गटबाजीमुळे पुण्यातील मनसे संघटनेत अनेक वाद निर्माण झाले. मात्र, यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याचे दिसून येते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!