मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाला असल्याचे चिन्ह असतांना आता ठाकरे गटाने यावर भूमिका घेतली आहे. काही नवहिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की, ज्याप्रमाणे बाबरी पाडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू. हे लोक इतिहासाचे व महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचे शत्रू आहेत. त्यांना महाराष्ट्राचे वातावरण विषारी करायचे आहे व स्वतःला हिंदू-तालिबानी म्हणून मिरवायचे आहे. हिंदुत्वाचे विकृतीकरण घडवून शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचाही ते अपमान करीत आहेत. शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले? मराठ्यांनी 25 वर्षे दुश्मनांना कसे झुंजवले? महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांचे थडगे याच मातीत कसे बांधले जाते? हा इतिहास काही लोकांना पुसून टाकायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चाललेले हे दळभद्री उद्योग मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंद पाडायला हवेत! असे आवाहन उद्धव ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या माध्यमातून केले आहे.
छत्रपती शिवरायांची आज जयंती. शिवरायांमुळे इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण मिळाले. छत्रपती शिवरायांच्या मुंबईतील पहिल्या पुतळ्याचे अनावरण करताना 26 जानेवारी 1961 रोजी केलेल्या भाषणात यशवंतराव चव्हाण यांनी असे उद्गार काढले होते की, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर भारताचे काय झाले असते ते सर्व जगाला माहीत आहे. पाकिस्तानची सीमा शोधण्याकरिता फार लांब जावे लागले नसते. कदाचित ती तुमच्या माझ्या घरापर्यंतही येऊन पोहोचली असती.’’ यशवंतरावांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, जर शिवाजी महाराज झाले नसते तर भारताच्या आणखी बऱ्याच भूभागावर, कदाचित तुमच्या माझ्या घरापर्यंतही मुसलमानांची बहुसंख्या झाली असती, त्या भूभागावरही पाकिस्तानने दावा सांगितला असता हे सत्य आहे. ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’ असे रामदासांनी शंभूराजांना लिहिले तेव्हा त्यांच्या नजरेसमोर त्या तेजस्वी राजाची धीरगंभीर मुद्राच उभी असावी. शिवरायांचे नाव घेतले की, प्रत्येक मराठी माणसाचे मन उचंबळून येते. मान अभिमानाने उंचावते व आदराने लवते. शौर्य आणि सहिष्णुता, त्याग आणि तेजस्विता, औदार्य आणि सत्यनिष्ठा अशा बहुविध गुणांनी फुललेले ते महान जीवन. मराठी जीवनाशी, महाराष्ट्राच्या मातीशी, देशाच्या भाग्याशी इतके एकरूप झालेले शिवाजीराजांसारखे दुसरे व्यक्तिमत्त्व नसेल.
छत्रपती महाराष्ट्रात जन्मास आले हे महाराष्ट्राचे भाग्य. महाराजांनी तलवारीच्या जोरावर ‘स्वराज्य’ निर्माण केले व जे त्यांच्या तलवारीस भिडले ते याच मातीत गाडले. त्यातला एक बादशहा औरंगजेब. औरंगजेबाची कबर म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचे, झुंजार पराक्रमाचे स्मारक आहे. ही ‘कबर’ हटवा नाहीतर आम्ही ती उद्ध्वस्त करू अशी भूमिका भाजप किंवा संघ पुरस्कृत काही माथेफिरू धर्मवेड्यांनी घेतली. त्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अगदी भरात होती तेव्हाची गोष्ट. पु. म. लाड तेव्हा केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्रालयाचे सचिव होते. महाराष्ट्रासंबंधी उलट-सुलट विचार प्रकट करणारे राज्यकर्त्यांचे अनेक ‘अंधभक्त’ त्यांच्याकडे येत. त्या वेळी लाड त्यांना एक ठरावीक उत्तर देत असत. ‘‘महाराष्ट्राबद्दलचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी औरंगाबादला (छत्रपती संभाजीनगर) जाऊन औरंगजेबाचे थडगे पाहून या,’’ असे ते या मंडळींना सांगत. औरंगजेबाचे थडगे हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या जिद्दीचे आणि मोगलांच्या पराभवाचे हे थडगे आहे. दख्खन जिंकण्यासाठी पाव शतक औरंगजेब महाराष्ट्रात राहिला. बादशाही थाटात तो अजमेरहून 8 सप्टेंबर 1681 रोजी निघाला तो 13 सप्टेंबर 1683 रोजी नगर येथे म्हणजे आताच्या अहिल्यानगरला येऊन पोहोचला. 3 मार्च 1707 रोजी हा शहेनशहा याच अहिल्यानगरात हतबल, हताश, पराभूत अवस्थेत मरण पावला. या 24 वर्षांच्या काळात मराठ्यांची राज्यसत्ता धुळीला मिळवणे व दख्खन काबीज करणे हेच आपल्या आयुष्याचे इतिकर्तव्य औरंगजेबाने मानले होते. त्यासाठी अवाढव्य फौज त्याने आणली होती.