अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची थकीत व पुरवणी देयके तातडीने अदा होणार!
शिक्षक समितीच्या पाठपुराव्यास यश ; शालार्थ प्रणालीत टॅब ऍक्टिव्ह;जवळपास 1 कोटींपर्यंतची देयके होणार अदा
सोलापूर : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची थकीत व पुरवणी देयके पद्धतीने अदा करण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडून टॅब उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले तालुक्यातील सव्वाशे शिक्षकांना एक कोटी रुपयाहून अधिक रकमेची देयके लवकरच अदा होणार असल्याची माहिती शिक्षक नेते दयानंद चव्हाण यांनी दिली.
राज्य शासनाकडून जवळपास 59 कोटी इतका निधी थकित व पुरवणी देयकासाठी सोलापूर जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता .31 मार्च पूर्वी शालार्थ वेतनप्रणालीद्वारे देयके सादर करणेबाबत शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना देऊनही अक्कलकोट शिक्षण विभागाने विहित मुदतीत देयके सादर न केल्याने केवळअक्कलकोट तालुक्यातील शिक्षक वंचित राहिले होते. त्यामुळे तालुक्यातील शिक्षकांत मोठ्या प्रमाणात असंतोष आणि अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती. ही बाब शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी आ. सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी देखील शिक्षणाधिकारी कादर शेख यांना याबाबतीत सूचना केली होती.
मागील दोन महिन्यापासून सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,शिक्षणाधिकारी(प्राथ.) कादर शेख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने केली होती. संघटनेच्या मागणीनुसार शिक्षण संचालक कार्यालयाकडून थकीत व पुरवणी देयके अदा करण्यासाठी टॅब शालार्थ प्रणालीमध्ये कार्यान्वित झाला असून लवकरच ही बिले संबंधित शिक्षकांना अदा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांची थकीत व पुरवणी देयकासाठी प्राप्त होणारा निधी हा वेतन लेखाशीर्ष 22020173-36 ह्या लेखाशीर्षावर जमा होत असल्याने तातडीने ऑफलाईन पद्धतीने थकीत व पुरवणी देयकाद्वारे मुख्याध्यापक पदोन्नती ,वरिष्ठ वेतनश्रेणी ,विषय शिक्षक वेतनश्रेणी ,सहावा व सातवा वेतन आयोग इत्यादी फरकबिले तसेच आंतरजिल्हा बदलीने हजर शिक्षकांचे वेतन व अन्य फरक शिक्षकांना मिळणार आहेत .