पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्याने जन्मदात्या आईलाच मारहाण केल्याचे समोर आले आहे. आपण मारहाण केली नाही असा दावा त्याने केला होता. मात्र स्वतः आईनेच समोर येऊन त्याचे पितळ उघडे पाडले आहे. मारुती देशमुख असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून तो मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचा अध्यक्ष आहे.
आईला मारहाण केल्याचा बनाव रचत माझ्या लहान भावाने राजेंद्र देशमुखने खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा दावा मारुतीने केला होता. मला अजित पवारांनी पद दिले म्हणून मला बदनाम करण्याचा डाव असल्याचा देखील याने म्हटले होते. आईच्या अंगावरील कायमस्वरूपी असलेले व्रण दाखवले तसेच प्रत्यक्षात तिला मारहाण केलीच नाही, असाही दावा याने केला होता.
मारुती देशमुखच्या या दाव्यानंतर स्वतः आईने माध्यमांना आपल्याला मारहाण केली असल्याचे सांगितले व मारुतीचे पितळ उघडे केले. मारुती व त्याच्या बायकोने आपल्याला मारहाण केली. लाकडी दांड्याने आपल्या पाठीत मारले. या पूर्वी देखील त्याने आणि त्याच्या बायकोने मारहाण केली आहे. फक्त त्याची बदनामी नको म्हणून मी काही बोलले नाही. मुलाची अब्रू वाचवण्यासाठी मी मूळ गावी आले. पण मुलाने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आईने केला आहे. तसेच या प्रकरणी आता पोलिसांमध्ये तक्रार केल्याची देखील माहिती आईने दिली आहे.
मारुती देशमुखवर अजित दादांनी कारवाई करावी, अशी मागणी मारुतीचे बंधू राजेंद्र देशमुख यांनी केली आहे. आता अजित पवार यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवारांनी यापूर्वी देखील त्यांचे पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. कुठलेही गैरकृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराच अजित पवारांनी दिला आहे. आता मारुतीच्या या कृत्यावर अजित पवार काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.