अहमदनगर : वृत्तसंस्था
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी आज अनेक जिल्ह्यात मतदान सुरु असून यावेळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाआघाडीचे उमेदवार नीलेश लंके असा सामना रंगला आहे. या मतदार संघात समाज सेवक अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव देखील येते. अण्णा हजारे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांनी मतदारांना कोणत्या उमेदवार मतदान करावे, याचा सल्ला देखील दिला आहे. कोणताही पक्ष आणि व्यक्तीला न पाहता मतदान करताना उमेदवार हा चारित्र्यशील, विचारशील तसेच निष्कलंक असला पाहिजे, अशा उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन अण्णा हजारे यांनी केले आहे. उमेदवारामध्ये अपमान सहन करण्याची शक्ती असेल, त्याच उमेदवाराला मतदान करण्याचे आवहन देखील त्यांनी केले आहे. उमेदवार हा दिव्यासारखा झटत राहिला पाहिजे, असे देखील अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
आपल्या देशासाठी अनेक नागरिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. अनेक जण फासावर गेले आहेत. तर कित्येकांना तुरुंगावास भोगावा लागला. त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. आपले स्वातंत्र्य आबाधीत ठेवायचे असेल, तर प्रत्येकाने मतदानाची जबाबदारी पार पडायला हवी, असे मतही हजारे यांनी व्यक्त केले आहे. जागृत मतदार लोकशाहीचा आधार असतो. त्यामुळे मतदार जागृत होईल त्या दिवशी देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही येईल, असे देखील अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. मतदानाला जाताना समोरच्या उमेदवाराचे चरित्र कसे आहे? त्याचे आचार – विचार कसे आहेत? त्याचे जीवन निष्कलंक आहे का? त्याच्या चरित्रावर दाग लागलेले आहे का? या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा, असे मतही अण्णा हजारे यांनी या वेळी व्यक्त केले.