ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढले : पंतप्रधान मोदी !

वाराणसी : वृत्तसंस्था

देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढले आहे आणि आपल्या वारशाचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. जगातील सर्वांत मोठ्या ध्यान केंद्र स्वर्वेद महामंदिराच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, गुलामगिरीच्या काळात भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी सर्वप्रथम आमच्या प्रतीकांना लक्ष्य केले. स्वातंत्र्यानंतर या सांस्कृतिक प्रतीकांची पुनर्बाधणी आवश्यक होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्बाधणीला विरोध झाला आणि ही विचारप्रक्रिया अनेक दशके प्रबळ राहिली.

याचाच परिणाम असा झाला की, देश निकृष्टतेच्या दरीत लोटला गेला आणि आपल्या परंपरेचा अभिमान बाळगायला विसरला. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर, काळाचे चाक पुन्हा एकदा फिरले आहे. सोमनाथपासून सुरू झालेले कार्य आता मोहीम बनले आहे. आज विश्वनाथाची भव्यता भारताच्या अविनाशी वैभवाच्या गाथा गात आहे. केदारनाथ विकासाच्या नव्या उंचीला स्पर्श करीत आहे आणि महाकाल महालोक अमरत्वाचा दाखला देत आहे. बुद्धिस्ट सर्किट विकसित करून भारताने जगाला भगवान बुद्धांच्या ध्यानस्थळांना भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. राम सर्किटचा विकास वेगाने सुरू आहे. येत्या काही आठवड्यांत अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!