लातूर : वृत्तसंस्था
केवळ काँग्रेसच नाही तर भारतीय जनता पक्षामध्येही घराणेशाही वाढत आहे. दोन्हीपैकी कोणाकडेही सत्ता गेली तरी ती एका विशिष्ट नात्यागोत्यामध्येच राहणार आहे. त्यामुळे विकास साधण्यासाठी परिवर्तनशिवाय पर्याय नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. वंचितच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या अनुषंगाने त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जाहीर सभा पार पडली.
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान झाल्यानंतर काँग्रेस-भाजपला विजयाची खात्री राहिलेली नाही. त्यामुळे मतमोजणीदरम्यान वंचित बहुजन आघाडीच हाच सर्वाधिक प्रभावशाली पक्ष राहणार असल्याचाविश्वास डॉ. आंबेडकर यांनी व्यक्त केला.
वंचित वगळता इतर सर्व पक्ष हे नात्यागोत्यांमध्ये अडकलेले आहेत. जरांगे-पाटील यांनी एवढे मोठे आंदोलन उभे करूनही ते केवळ गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना उमेदवारी डावलली गेली. निवडणूक कोणतीही असो लातूरकरांना उजनीच्या पाण्याचे गाजर दाखवले जाते. काँग्रेसचा बालेकिल्ला असा दावा केला जात असलेल्या लातुरातील मूलभूत समस्या मिटलेल्या नाहीत तर केवळ राखीव मतदारसंघ असल्याने येथे . डॉ. काळगे यांना संधी मिळाली, अन्यथा हा उमेदवारदेखील देशमुखच असता, असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये सत्तेत येताच सीबीआय, ईडी, इन्कटॅक्स यामुळे १७ लाख हिंदू कुटुंबांनी देश सोडला. त्यामुळे पुन्हा हेच सरकार राहिल्यास देशाचे वाटोळे होणार, मणिपूरसारख्या घटना गल्लीबोळात होतील. त्यामुळे परिवर्तनासाठी वंचित बहुजन आघाडीला साथ देण्याचे आवाहन त्यांनी लातूरकरांना केले.