---Advertisement---

मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली मध्येच अडकली; भाविकांची धावपळ

By team
On: February 4, 2026 10:52 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था 

कल्याण येथील मलंगगडावर जाणारी फ्युनिक्युलर ट्रॉली क्षमतेपेक्षा जास्त भाविकांना घेऊन जात असताना मध्येच अडकल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ट्रॉलीतून प्रवास करणारे भाविक वाटेतच अडकल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलंगगडावर सध्या यात्रा सुरू असल्याने भाविकांची मोठी गर्दी होत आहे. आजही दुपारच्या सुमारास मोठ्या संख्येने भाविक फ्युनिक्युलर ट्रॉलीत बसले. मात्र क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी ट्रॉलीत बसवण्यात आल्याने ती वाटेतच बंद पडली. यामुळे ट्रॉलीत असलेले भाविक मध्येच अडकले आणि सर्वत्र गोंधळ उडाला.

विशेष म्हणजे मागील महिन्यात मोठ्या गाजावाजात देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रॉली मलंगगडासाठी सुरू करण्यात आली होती. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. सोमवारी मंत्री व व्हीआयपींच्या उपस्थितीतही ट्रॉली काही काळ बंद पडल्याची घटना घडली होती, त्यामुळे संभाव्य अपघाताची भीती व्यक्त केली जात होती.

मलंगगड हे हिंदू व मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असून सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या या गडावर जाण्यासाठी पूर्वी दोन तासांची अवघड चढाई करावी लागत होती. ज्येष्ठ नागरिक व महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी स्वित्झर्लंडच्या धर्तीवर फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव २००४ साली सादर करण्यात आला, प्रत्यक्ष कामाला २०१२ मध्ये सुरुवात झाली. पुढे काही काळ प्रकल्प रखडला, मात्र नंतर नव्याने कंत्राटदार नेमून कामाला गती देण्यात आली. अखेर जानेवारी २०२६ मध्ये या फ्युनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण झाले.

दरम्यान, वारंवार तांत्रिक बिघाड आणि आजची घटना पाहता सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून, प्रशासनाकडून चौकशी व योग्य उपाययोजना केल्या जातात का, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!