मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड खून प्रकरण ताजे असतांना विरोधक सत्ताधाऱ्यावर आरोपाच्या फैरी झाडत असतांना नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
सरकारला बीडसारखे खून पचवायची सवय आहे. बीडमधील खून आणि गुन्ह्यांना वाचा फुटल्याने महाराष्ट्र अस्वस्थ झाला. त्यामुळे सरकार हादरले. म्हणून सरकारला अखेर हालचाल करावी लागली, असे संजय राऊत म्हणाले. बीडचे आका, सध्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबतचे फोटो, त्यांचा एकमेकांशी असलेला वावर, त्यांचे संवाद यामुळे खरोखर न्याय मिळेल का? खरा तपास होईल का? अशा लोकांच्या मनात शंका येऊ शकतात, असेही ते म्हणाले.
कुणालाही सोडणार नाही, असे देवेंद्र फडणवीस फक्त बोलत आहेत. पण गेल्या काही काळात देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना सोडले, किती जणांच्या रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतले आहे. किती जणांच्या आक्रोश आणि किंकाळ्या दाबल्या आणि किती जणांना अडकवलंय यासंदर्भात त्यांनी स्वत:च स्थापन करून स्वत:च रिपोर्ट घ्यायला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस बीडच्या प्रकरणामध्ये गंभीर असल्याचे दिसतंय, असे मला कुणीतरी सांगितले. कारण महाराष्ट्र राज्याची बदनामी झाली आहे आणि महाराष्ट्राची बदनामी ही मुख्यमंत्र्यांची बदनामी आहे. एका वाल्मीक कराडला अटक केली, पण हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे अशी माझी मागणी आहे.. सरकार आणि गृहमंत्री त्यांचा आहे, त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही हा खटला चालला, तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.