मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा दाखला देत रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंगे बंद ठेवण्याची ताकीद दिली. तसेच या प्रकरणी आवाजाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसी कारवाई करण्याचाही इशारा दिला. यावेळी त्यांनी हे भोंगे बंद होतील, पण सकाळी 9 च्या भोंग्याचे काय करायचे? असा प्रश्न करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही टोला हाणला. त्यांचा हा सवाल ऐकताच सभागृहात हास्याचे कारंजे उडाले.
भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. राज्यात प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांतून कर्णकर्कश आवाज होतो. विशेषतः मशिदींवरील भोंग्यांतून दिवसातून 3 ते 4 वेळा नमाज अदा केली जाते. सरकारने यासंबंधी दिलेले उत्तर समाधानकारक नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत भोंग्यांचा आवाज बंद झाला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अध्यक्ष महोदय, हे भोंगे बंद होतील, पण सकाळी 9 च्या भोंग्याचे काय करायचे? त्यांचा हा प्रश्न ऐकताच सभागृहात हशा पिकला. त्यानंतर ते पुढे म्हणाले, देवयानी फरांदे यांनी उपस्थित केलेला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही प्रार्थनास्थळावर असणाऱ्या भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी लागते. हे भोंगे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंदच असले पाहिजे. त्यानंतर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दिवसा 55 डेसिबल व रात्री 45 डेसिबलची मर्यादा असावी. त्याहून अधिक आवाज असता कामा नये, असे कोर्टाचे निर्देश आहेत.
या प्रकरणी एखाद्या ठिकाणचा भोंगा अधिक डेसिबलने वाजत असेल तर त्याचे अधिकार हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी स्वतः दखल घेऊन त्यांना कळवायचे आहे. त्यानंतर त्यांनी त्यासंबंधी जी काही कारवाई असेल ती करावी अशा प्रकारची आताची कायद्याची परिस्थिती आहे. हे खरे असले तरी त्यावर अंमल होताना दिसत नाही. म्हणून यासंबंधी काही सूचना आम्ही निर्गमित करत आहोत. त्यात कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. ती निश्चित कालावधीसाठीच दिली जाईल. त्या कालावधीनंतर त्यांना परवानगी हवी असेल तर त्यांना ती पोलिसांकडे जाऊन ती पुन्हा रितसर घ्यावी लागेल.