सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील होटगी रोड परिसरातील काजल नगरातील रहिवासी जब्बार इमामसाहेब इंगळगी हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना स्टॉकिस्ट बनण्याचा मोह नडला आणि नऊ लाख रुपयाला गंडा बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोंबर रोजी एका वर्तमानपत्रात कंपनीचे स्टॉकिस्ट बना अशी जाहिरात वाचली. त्यानुसार त्यांनी एपी सर्व्हिसेसचे सागर आनंद जाधव (रा. समर्थ नगर, मिरज) यांच्याशी संपर्क साधला असता दर आठवड्याला ४० ते ५० हजार रुपये कमवाल, असे सांगून जाधव यांनी इंगळगी यांचा विश्वास संपादन केला. आर्थिक पत पाहण्याकरता खात्यावर ८ लाख ४५ भरण्यास सांगितले. त्यानुसार खात्यावर रक्कम जमा केली. क्रॉस चेकही दिला. जाधव याने दुसरे बनावट चेक तयार करून इंगळगी यांच्या खात्यातील ८ लाख ४५ हजार रुपयेची रक्कम सातारा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जमा करून ती रुबी सर्व्हिसच्या नावाने ट्रान्सफर केली. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर इंगळगी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात सागर आनंद जाधव, एपी सर्व्हिसेस मिरज व रुबी सर्व्हिसेस सातारा यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास दुय्यम पोलीस निरीक्षक शिंदे हे करत आहेत.