अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : अक्कलकोट व दुधनी नगर परिषदेत लवकरच उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्यांच्या निवडी होणार असून,
या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी गॉडफादरमार्फत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून, अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींच्याच हाती असल्याने निवडीबाबतचा सस्पेन्स
अद्याप कायम आहे.
नगर परिषद निवडणुकीदरम्यान उमेदवारी देताना अनेकांची नाराजी पक्ष नेतृत्वाला पत्करावी लागली होती. त्यावेळी दिलेली आश्वासने आता उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीत अडचणी ठरू शकतात. त्यामुळे भाजप व शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींना यावेळी आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भाजपकडील अंतिम निर्णय आमदार सचिन कल्याणशेट्टी घेणार असून, शिवसेना शिंदे गटाकडील निर्णय माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे घेणार असल्याची माहिती आहे.
अक्कलकोट नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपमध्ये माजी शहराध्यक्ष शिवशरण जोजन, प्रवीण शहा, लखन झंपले, सिद्धाराम टाके, अशोक जाधव, उत्तम गायकवाड व रशीद खिस्तके आदी नावे चर्चेत आहेत. तर उपनगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठत्वाचा विचार करता महेश हिंडोळे, यशवंत धोंगडे,महेश इंगळे यांच्या नावांची प्रामुख्याने चर्चा सुरू आहे. तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या भूमिकेतून मुस्लिम समाजाकडून अल्फिया कोरबू किंवा दलित समाजातून अविनाश मडीखांबे यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुधनी नगर परिषदेत शिंदे सेनेची एकहाती सत्ता असून, तेथील स्वीकृत नगरसेवक पदासाठी डॉ. उदयकुमार म्हेत्रे, बसवराज रायप्पा हौदे, राजशेखर सैदप्पा परमशेट्टी आणि सचिन सिद्धाराम झळकी यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी सिद्धाराम येगदी, सातलींगप्पा शरणप्पा परमशेट्टी, जिलानी चांद नाकेदार आणि महंतेश मुर्गेप्पा पाटील ही नावे पुढे येत असून, अंतिम संधी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सर्व घडामोडींमुळे अक्कलकोट व दुधनी या दोन्ही ठिकाणी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून, अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत उत्सुकता कायम राहणार आहे.