वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाने अक्कलकोट तालुका हादरला; शेतीचे प्रचंड नुकसान
अनेक ठिकाणी गारपीट,पिकांचे मोठे नुकसान
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तालुक्यात मंगळवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत असताना सायंकाळी अचानक ढग दाटून आले आणि काही क्षणातच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाने यापूर्वीच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता.
या पावसात सांगवी व अक्कलकोट परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून, यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट झाल्याचे वृत्त समोर येत आहे. काही ठिकाणी गारांचा मारा इतका तीव्र होता की शेतातील पिकांवर त्याचा मोठा परिणाम झाला.
तालुक्यातील किरनळळी येथे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने जोरदार पाऊस झाला. खैराट, गोगांव, भुरीकवठे येथेही विजांच्या गडगडाटासह पावसाची नोंद झाली. चपळगाव, नागणसूर, उमरगे, निमगाव, गौडगाव खुर्द येथे रिमझिम पावसाने हजेरी लावली. सांगवी बु. व खुर्द येथे गारांचा पाऊस पडला. बादोले बुद्रुक येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
सलगर, नन्हेगाव, बागेहळळी, सुलतानपूर, दोड्याळ आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोर धरला. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने झाडांच्या फांद्या तुटणे, तसेच शेतीत पत्रे उडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वीजपुरवठाही काही भागात खंडित झाल्याचे समजते.
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला असून आंबा, गहू, ज्वारी, द्राक्ष यांसह इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीट व वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. द्राक्षबागा, आंब्याची फळधारणा तसेच काढणीच्या उंबरठ्यावर असलेले गहू व ज्वारी या पिकांवर विशेष परिणाम झाला आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसानीचा आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.