मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला मोठी गळती लागली होती. तर आता ठाकरे गटात पक्ष पातळीवर धीरगंभीर चर्चा सुरू असताना पक्षाने रत्नागिरी जिल्ह्यातील 3 पदाधिकाऱ्यांवर पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका दाखवत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या तिघांच्याही हकालपट्टीचे पत्र ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे.
ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीनंतर कोकणात सातत्याने हादरे बसत आहेत. माजी आमदार राजन साळवी यांनी नुकतीच ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता आमदार भास्कर जाधव यांनीही पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त केल्यामुळे ते ही शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या 3 पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळून – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रोहन बने यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे, असे यासंबंधीच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले विलास चाळके व राजेंद्र महाडिक हे दोन नेते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यांची आमच्या पक्षात येण्याची इच्छा आहे. त्यापैकी काहींचा आज पक्षप्रवेश होत आहे. माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने व जिल्हाप्रमुख विलास चाळके हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज प्रवेश करणाऱ्यांची यादीत वाचत बोसलो तर एकनाथ शिंदे साहेब येथे लँड होतील. ठाकरे गटाचे 150 हून अधिक पदाधिकारी आज शिवसेनेत येत आहेत, असे ते म्हणाले.