मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना कोणाची, याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा न्यायालयाच्या गाइडलाइन धुडकावणारा आहे. त्यामुळे शिवसेनेबाबत विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा राजकीय निवाडा आहे. या निकालामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक-अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली असताना आगामी निवडणुकीत या निकालाचा चांगला उपयोग होईल, असे त्यांनी नमूद केले आहे. राज्यातील सत्तासंघर्षाबाबतच्या निकालानंतर पुण्यात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
ते पुढे म्हणाले, नार्वेकर यांच्या निकालाची माहिती ही सत्ताधारी पक्षाला अगोदरच होती. त्यामुळे त्यांनी निकालाबाबत अगोदरच भाष्य केले होते. सत्ताधारी पक्षाला जर निकालाची अगोदरच माहिती मिळणार असेल, तर तो राजकीय निवाडा म्हणावा लागणार आहे. पवार यांनी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या दाव्याबाबत सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीच्या वेळी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असल्याने त्यांना पुन्हा बोलावता येत नाही, असे नमूद करून एकनाथ शिंदे यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयानंतर न्यायालयाने आमदार अपात्रतेबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी घेऊन तो कळवावा, असेही म्हटले होते.
आजच्या विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे उद्धव ठाकरे यांना न्यायालयात जाण्याचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे. कारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली होती, ही बाब लक्षात घेणे गरजेचे असताना विधानसभा अध्यक्षांनी पक्षसंघटना लक्षात न घेता केवळ विधिमंडळातील पक्ष लक्षात घेतला आहे. त्यामुळे व्हीपबाबत अधिक स्पष्टता येणे गरजेचे आहे.