नाशिक : वृत्तसंस्था
राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे पक्ष प्रवेश सुरु असतांना आता अजित दादांच्या राष्ट्रवादीत देखील एका मोठ्या नेत्याने प्रवेश घेतल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नाशिकमध्ये गळती सुरु झाली आहे. पक्षाचे नेते माजी नगरसेवक नाना महाले यांनी शरद पवार यांची साथ सोडली असून अजित पवारांचे घड्याळ हाती घातले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेलं अपयश लक्षात घेता आगामी पालिका निवडणुकांच्या दृ्ष्टीने महाले यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, महाले यांनी पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने आपण हा प्रवेश केल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्वत: ‘एक्स‘वर पोस्ट करुन महाले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची माहिती दिली आहे.
नाना महाले हे मुळचे काँग्रेस पक्षाचे नेते असून १९९२ मध्ये ते सर्व प्रथम नाशिक महापालिकेत निवडून आले होते. ते मराठा विद्याविद्याप्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी बदलेली समीकरणे पाहाता त्यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांची वाट धरली होती. मात्र, आता पुन्हा ते स्वगृही अर्थात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत परतले आहेत.
आपल्या समर्थकांसह महाले यांनी मंगळवारी मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीतअजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार हिराण खोसकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.