अक्कलकोट (प्रतिनिधी) तालुक्यातील भासलेगाव येथील प्राथमिक शिक्षक बसवराज गुरव सर यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती कन्नड विभागाच्या राज्याध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. सीमावर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, अनेकदा दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या आणि कर्नाटक राज्याला लागून असलेल्या अक्कलकोटसारख्या टोकाच्या छोट्या तालुक्याने आज इतिहास रचला आहे.
या मातीतून घडलेल्या, संघर्षातून तावूनसुलाखून निघालेल्या आणि कर्तृत्वाच्या बळावर नेतृत्व सिद्ध करणाऱ्या बसवराज गुरव सर यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती कन्नड विभागाच्या राज्याध्यक्षपदी निवड झाली आहे. पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या प्रसंगी उदयजी शिंदे, राज्याध्यक्ष विनयजी कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, राज्य प्रसिद्धी प्रमुख डॉ. रंगनाथ काकडे महाराज, राज्य संघटक प्रताप काळे, जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, जिल्हा सरचिटणीस शरद रूपनवर, जिल्हा नेते अमोगसिद्ध कोळी, मल्लिकार्जुन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष संजीवकुमार बेन्नेसुर यांच्यासह असंख्य शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत निवडपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
ही निवड केवळ एका व्यक्तीची नसून अक्कलकोटसह सोलापूर, सांगली, पुणे, मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कन्नड माध्यम शाळांतील शिक्षकांच्या संघर्षशीलतेची, निष्ठावंत कार्याची आणि सीमावर्ती कन्नड शिक्षकांच्या एकजुटीची आहे.
शिक्षक समितीतील हाडाचे कार्यकर्ते, न थकणारे लढवय्ये, शांत व संयमी स्वभावाचे, प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढणारे आणि “जिल्हाध्यक्ष (कन्नड)” म्हणून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणून बसवराज गुरव सरांकडे पाहिले जाते.
कन्नड विभागाच्या राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिद्धाराम बिराजदार, राजशेखर उंबरणीकर, शंकर अजगोंडा, बसवराज स्वामी, विक्रांत गोरे, वासुदेव देसाई, कल्याणी गंगोंडा, सिद्धाराम तेग्गेळी, शरणप्पा फुलारी, राजकुमार नरुणे, कल्लया गणाचारी यांच्यासह शिक्षक समितीच्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
इतिहासात प्रथमच कन्नड राज्याध्यक्षपद अक्कलकोट तालुक्याला लाभले असून, यामुळे सीमावर्ती भागातील कन्नड शिक्षकांचा आवाज आता थेट राज्यस्तरावर अधिक प्रभावीपणे मांडला जाणार आहे. ही निवड सन्मानासोबतच नवी जबाबदारी, नवी उमेद आणि नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कन्नड शिक्षक चळवळ अधिक बळकट होईल.
— बसवराज गुरव
नूतन राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती (कन्नड विभाग)