ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महिन्याभरापूर्वी झाले लग्न : नवविवाहित दाम्पत्याने घेतला टोकाचा निर्णय !

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही महिन्यापासून अनेक कारणाने चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील केतुरा या गावी एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहित दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काल पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर आज गुरुवारी पतीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.

लग्नानंतरचा पहिला महिना नवरा-बायकोसाठी विशेष आनंदाचा आणि स्मरणीय असतो. हा काळ नव्या नात्याचा, नवीन जबाबदाऱ्यांचा आणि परस्परांना अधिक समजून घेण्याचा असतो. पण याच काळात नवदाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याने दोन्ही कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

अक्षय गालफाडे आणि शुभांगी गालफाडे असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर दोघेही पुण्याला राहत होते. लग्नानंतर काही दिवस सुखाने संसार सुरू होता. मात्र त्यानंतर सातत्याने होणाऱ्या कौटुंबिक वादानंतर ते परत आपल्या गावी परतले. त्यानंतर देखील त्यांच्यात या ना त्या कारणावरून सारखे वाद होत राहिले.

रोज रोज होणाऱ्या या वादाला कंटाळून बुधवारी शुभांगीने आत्महत्या केली तर आज पहाटे अक्षयने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. त्याच्या आत्महत्येची बातमी ज्यावेळी कुटुंबियांनी कळली, त्यावेळी त्याच्या आईने मोठा हंबरडा फोडला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group