मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. नुकतेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले कि, आताचे राजकारणी धंदेवाले आहेत. सत्ताधाऱ्यांची दुकानं बंद करण्यासाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. सत्ताधारी एकमेकांची ऊनीदुनी काढण्यात मग्न असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
यावेळी बोळातून ते म्हणाले, दररोज राज्यात 13 शेतकरी आत्महत्या करत आहेत. आतापर्यंत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. या प्रश्नाचे गांभीर्य सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही नाही. एकमेकांची उणीधुणी काढण्यात ते मग्न आहेत. एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली जाते. जणू काही टोळी युद्ध महाराष्ट्रात सुरू आहे”, असे राजू शेट्टी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, राज्यात सामान्य जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. त्यामुळे राज्यातील चळवळीची पार्श्वभूमी असणारे जे पक्ष आहेत, ज्या संघटना आहेत, त्या सर्वांना सोबत घेऊन खरे जनतेचे प्रतिनिधी शोधून, जसा प्रयोग दिल्ली किंवा पंजाबमध्ये झाला तशा प्रकारे जनतेतून उमेदवार उभे करणार आहे. अशा प्रकारे एक आघाडी करून एक सक्षम असा पर्याय देणार आहे. सत्ताधारी हे धंदेवाले झाले आहेत. त्यांची दुकानदारी बंद पाडणार”, असे राजू शेट्टी म्हणाले.