मुंबई : वृत्तसंस्था
दारूमुळे देशात अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारुबंदी झालीच पाहिजे. याबाबत मी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र दिले होते. मात्र त्यांनी त्यावर काहीही पाऊल उचलले नाही. याबाबत त्यांना अटक झाली आहे. जर त्यांनी चूक केली असेल तर त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.
केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी रात्री अटक केली. यावर बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारने दारू विक्रीचे परवाने देताना मोठा उलटफेर केला होता. यात मोठे आर्थिक व्यवहार झाले होते, अशी देशभर मोठी चर्चा झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत कारवाई होईल, असे बोलले जात होते. अखेर गुरुवारी न्यायालयाने केजरीवाल यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला व रात्री उशिरा केजरीवाल यांना ईडीच्या पथकाने अटक केली. याबाबत शुक्रवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, अण्णा हजारे यांच्या जनआंदोलनातून केजरीवाल हे नेतृत्व पुढे आले होते. पुढे केजरीवाल यांनी अण्णांची साथ सोडत राजकारणात प्रवेश करत दिल्लीचे मुख्यमंत्रीपद मिळवले. केजरीवाल यांच्या दारू परवाने धोरणावर अण्णा हजारे यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती.