मुंबई : वृत्तसंस्था
विधानभवनाच्या प्रवेशद्वारासमोर मंत्री आणि आमदार आपसात भिडले. एकमेकांना शिव्या दिल्या. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांचा हा विकास असेल तर विकासाची व्याख्या बदलावी लागेल, असा खोचक टोला शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शनिवारी लगावला. आरएसएसला यासंदर्भात पत्र लिहिणार असल्याचेही ते म्हणाले.
राज्य विधिमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व काही ठीक असल्याचे म्हटले आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, शिवसेनेत मुंबईतल्या अंडरवर्ल्डप्रमाणे गँगवॉर सुरू आहे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी याप्रकरणी मत व्यक्त करावे. राज्यात एकप्रकारे गँगवॉर सुरू आहे. सत्ताधारी सरकारचा हाच विकास असेल तर विकासाची व्याख्या बदलावी लागेल. या नव्या विकासाच्या संकल्पनेबाबत आपण आरएसएसला पत्र लिहिणार आहे.
राऊत पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराबद्दल नेहमी बोलत असतात; परंतु या सर्व भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या लोकांना भाजपत आणले जात आहे. हाच आहे का देशाचा विकास? विकासाच्या नावाने जनतेची फसवणूक सुरू असल्याचा घणाघातही राऊत यांनी केला. लोकसभा जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद सुरू असल्याच्या मुद्द्यांवर राऊत यांनी स्पष्टीकरण केले. आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. प्रकाश आंबेडकर सोबत आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.