मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कणखर, कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. मुंबईहून बारामतीकडे येत असताना बारामती विमानतळावर लँडिंगच्या काही मिनिटे आधीच भीषण अपघात झाला. अपघात इतका भयावह होता की विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्राचे हृदय पिळवटून टाकले आहे.
आज बारामती येथे अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बारामतीच्या दौऱ्यावर होते. मात्र नियतीने घात केला आणि राज्याला आपल्या धडाडीच्या नेतृत्वाला मुकावे लागले. काम करणारा नेता अशी ओळख असलेले अजितदादा सकाळी सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करायचे. मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या दिवसापर्यंतही ते राज्याच्या कामात पूर्णतः व्यस्त होते, हे त्यांच्या दिनक्रमावरून स्पष्ट होते.
मुंबईत असताना अजित पवार सकाळी ८.३० वाजता मंत्रालयात उपस्थित राहून कामकाजाला सुरुवात करायचे. मंगळवारी देखील सकाळी ८.३० वाजता ते मंत्रालयात दाखल झाले होते. त्यांच्याकडे आलेल्या सर्व फाईल्स त्यांनी क्लिअर केल्या. त्यानंतर वित्त विभागाचे सचिव, महसूल विभागाचे सचिव, जीएसटी आयुक्त आणि एक्साइज आयुक्त यांच्यासमवेत चालू आर्थिक वर्षातील राज्याच्या उत्पन्नाचा सविस्तर आढावा घेतला. राज्याचे उत्पन्न कसे वाढेल, याबाबत त्यांनी सर्व सचिवांना ठोस सूचना दिल्या. ही बैठक दीड तास चालली.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत कॅबिनेट बैठकीबाबत चर्चा करून ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले. कॅबिनेटनंतर पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीतही त्यांनी सहभाग घेतला. पुढे पुन्हा दालनात येऊन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. हे सर्व आटोपून दुपारी २.३० वाजता ते देवगिरीकडे रवाना झाले. शेवटच्या दिवसापर्यंतही राज्याचे आर्थिक उत्पन्न वाढावे, विकासाला गती मिळावी, यासाठी ते सातत्याने कार्यरत होते, हे यातून अधोरेखित होते.
दरम्यान, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देणारे अजित पवारांचे एक ट्विट दुपारी ३ वाजून १६ मिनिटांनी प्रसिद्ध झाले होते. हेच ट्विट त्यांचे शेवटचे ट्विट ठरले. शेवटच्या श्वासापर्यंत राज्यासाठी विचार करणारा, निर्णय घेणारा आणि काम करणारा नेता महाराष्ट्राने गमावला आहे.
अजित पवार यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कार्याची, कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची उणीव कायम जाणवत राहील. महाराष्ट्राचा हा कणखर नेता आज कायमचा शांत झाला असला, तरी त्यांचे कार्य आणि आठवणी जनतेच्या मनात अढळ राहतील.