मुंबई : वृत्तसंस्था
देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसीत भारताचा आहे. भारताला गतीने पुढे नेणारा आणि प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शुक्रवारी सुरुवात झाली. मोदी सरकारच्या ऐतिहासिक तिसर्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडला. संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक उत्तम अर्थसंकल्प सादर केला आहे. हा एक स्वप्नवत अर्थसंकल्प म्हणता येईल, विशेषतः मध्यमवर्गासाठी. आयकर सवलत १२ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही घोषणा भारताच्या अर्थव्यवस्थेत एक मैलाचा दगड ठरेल. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या हातात खर्च करण्यायोग्य उत्पन्न येईल. यामुळे खरेदी होईल, मागणी वाढेल आणि एमएसएमईला फायदा होईल. रोजगार निर्माण होईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येईल. १०० जिल्ह्यात शेती विकासाच्या योजना असतील किंवा तेलबियांच्या संदर्भातील घोषणांमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी फायदा होईल. शेती क्षेत्रामध्ये विविध प्रकारची गुंतवणुक सरकारने घोषित केली आहे. एमएसएमईच्या क्षेत्राला फायदा होणार आहे. हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असल्याने त्याचा तरूणांना फायदा होणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.