कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी फटकारलं आहे. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराने सार्वजनिक मंचावर अशा शब्दांचा वापर करणे हे महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली आहे.
जत येथे भाजपच्यावतीने आयोजित निषेध मोर्चावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. या विधानावरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटले असून पडळकर यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांकडून टीका होत आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत पडळकर यांच्या विधानाचा समाचार घेतला.
सतेज पाटील म्हणाले, गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा आणि राजारामबापू पाटील कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा अवमान असून त्यांनी वापरलेली असभ्य भाषा ही स्तरहीन आणि समाजातील सभ्यता पायदळी तुडवणारी आहे. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराने सार्वजनिक मंचावर अशा शब्दांचा वापर करणे हे महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.