ध्यास विश्वसार्ह बातमीचा

यंदा मोदकचे भाव कडाडले : ४० रुपयापर्यत पोहचले मोदक !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात लाडक्या बाप्पाच्या आगमनासोबतच बाप्पाच्या प्रसादात महत्त्वाचे स्थान असलेला मोदक भक्तांना खुणावू लागला आहे. मात्र यंदा मोदकाचे भाव चांगलेच कडाडल्याने मोदक केवळ प्रसाद म्हणूनच खाऊन समाधान मानावे लागणार आहे. नवी मुंबईत काही ठिकाणी मोदकांचा भाव 35 रुपये, तर काही ठिकाणी 40 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तरीही बाप्पासाठी मोदकांची आगाऊ मागणी नोंदवली जात आहे.

बाप्पाच्या प्रसादाचे ताट मोदकांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे गणेशोत्सवात फुले, आरास, बेल पत्री इतकेच महत्त्वाचे स्थान मोदकाचे असते. पांढर्‍या शुभ्र तांदळाच्या पिठात ओला नारळ आणि गुळाचा चव भरून त्याला वळणदार 11 कळ्या पाडून, वरून केशराचा हलकासा रंग आणि सुवास असलेला उकडीचा मोदक बाप्पाची भूक जागवत नसेल तरच नवल!

यामुळेच आपल्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या बाप्पाला त्याच्या आवडीचा उकडीचा मोदक देण्याचा भक्तांचा प्रयत्न असतो. मात्र नारळाच्या तांदळाच्या आणि गुळाच्या वाढलेल्या किमती तर, दुसरीकडे वाढलेल्या मजुरीमुळे पाच वर्षांपूर्वी 21 रुपयांना मिळणारा मोदक आता 35 ते 40 रुपयांवर पोहोचला आहे. या मोदकात सुक्या मेव्याची मुक्तहस्ते पेरणी करण्याचा प्रयत्नही काही जणांकडून केला जातो.

नोकरी-धंद्यानिमित्त कामावर जाणान्या महिलांना मोदक बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. अनेकदा नैवेद्याचा स्वयंपाक तयार करताना मोदकासाठी वेळ पुरत नसल्यानेही बाप्पाच्या प्रसादाचे मोदक बाहेरून विकत घेण्याकडे कल वाढला आहे. त्यातच घरात किमान एकाला तरी मधुमेहाने ग्रासलेले असल्याने सर्वांच्याच गोड खाण्यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे केवळ प्रसादासाठी पाच किंवा 11 मोदक खरेदी करण्यावर भर दिला जात असून 21 मोदकांचा नैवेद्यही 5 आणि 11 वर आल्याचे भक्तांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!